Thane Road Accident: ठाणे (Thane) शहरातील घोडबंदर रोड (Ghodbunder Road) वर नागला बंदर परिसरात रविवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. गजल तुटेजा (Gajal Tuteja) या २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गजल ही आपल्या स्कूटीवरून कॅडबरी जंक्शनजवळून जात होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या डंपरने (Dumper) गजलला धडक दिली आणि काही क्षणातच तिच्या अंगावरून डंपर गेल्याने तिचे शरीर अक्षरशः दोन भागांमध्ये विभागले गेले.
गजल घोडबंदर रोडवरील एका सोसायटीत राहत होती. तिच्या कुटुंबात आई आणि लहान भाऊ अक्की तुटेजा (Akki Tuteja) हेच दोन आधार होते. वडील नसल्याने घरची पूर्ण जबाबदारी गजलवरच होती. ती एका खासगी कंपनीत काम करायची आणि त्यासोबतच पोळीभाजीचा छोटासा व्यवसायही सांभाळायची.
अपघाताच्या रात्री गजलने आपल्या लहान भावाला खाली बोलावले होते. दोघे मिळून बाहेर जेवायला जाणार होते. मात्र अक्की जेव्हा खाली आला तेव्हा काहीच मिनिटांतच मोठी गर्दी त्याला दिसली. गर्दीत वाट काढत पुढे गेल्यावर त्याला आपल्या बहिणीचा छिन्नविछिन्न मृतदेह दिसला. हा प्रसंग बघून तो जागेवरच थिजला. अक्कीने आईला फोन करून या घटनेची माहिती दिली. आईने धाव घेतली आणि चादरीत गुंडाळून गजलचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी गजलला मृत घोषित केलं.
या भीषण अपघातामुळे नागला बंदर परिसरातील खराब रस्त्यांची परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे. स्थानिकांनी घोडबंदर रोडवरील खड्डे, उखडलेले रस्ते आणि अव्यवस्थित वाहतूक यावर संताप व्यक्त केला आहे. पोलिसांचा अंदाज आहे की रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच गजलचा स्कूटीवरील ताबा सुटला आणि ती थेट डंपरखाली गेली.
गजलच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ती घरची एकटी कमावणारी होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.