Maharashtra Weather: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. कधी पाऊससदृश ढगाळ वातावरण, तर कधी अचानक धावून आलेली थंडी… अशा बदलत्या हवामानात मध्य महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट सुरू आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून किमान तापमान झपाट्यानं खाली घसरत आहे. पुण्यात तर सलग तिसऱ्या दिवशी पारा दहा अंशांच्या खाली नोंदवला गेला.
पुणे (Pune City) शहरात गुरुवारी हंगामातील सर्वात नीचांकी तापमान नोंदलं गेलं. पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी किंचित ऊन पण त्यात ऊब नसलेली ही परिस्थिती कायम राहिली. शहरात किमान तापमान ७.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली आलं. भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD Dept) पुढील काही दिवस पारा दहा अंशांच्या खाली राहण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
पहाटेपासूनच बोचरे वारे सुटल्याने शहरभर गारठा पसरला होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत वातावरणात तीव्र गारवा जाणवत होता. दुपारी थोडं ऊन फुटलं असलं तरी त्यातही उष्णता जाणवलं नाही. हवामान कोरडे असून आकाश दिवसभर निरभ्र राहिल्याने थंडीचा कडाका वाढला. उपनगरांमध्ये तर आणखी तीव्र गारवा अनुभवायला मिळाला. दिवसभरात कमाल तापमान २८.७ अंश सेल्सियस नोंदलं गेलं.
थंडीचा आनंद घेण्यासाठी सकाळ-संध्याकाळ टेकड्या, बागा आणि उद्यानांमध्ये पुणेकरांची मोठी गर्दी दिसत आहे. वेगवेगळ्या जाड स्वेटर, शाली, जर्किन घालून अनेक जण हिवाळ्यानं मिळालेला हा ‘फॅशन सीझन’ही एन्जॉय करत आहेत. शहराच्या उपनगरांमध्ये सुरक्षा रक्षक आणि स्थानिक लोक दुकानांबाहेर, सोसायट्यांच्या परिसरात ऊब मिळवण्यासाठी शेकोट्या पेटवत आहेत.
पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार आहे.
थंडीचा इशारा असलेले प्रमुख जिल्हे :
-
अहमदनगर
-
सोलापूर
-
पुणे
-
धुळे
-
जळगाव
-
नाशिक
तर नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, परभणी, नागपूर, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही थंडी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.






