ठाकरे सरकार करणार शेतकऱ्यांची दिवाळी गोड! सोमवारपासून होणार खात्यावर पैसे जमा

मुंबई । कोरोनाच्या संकटानंतर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे आता ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे वचन दिले होते. ते सरकार पूर्ण करत आहे. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे.

त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे देखील यामध्ये वाहून गेली आहेत.

या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांनी केली होती. पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदत करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला होता.

आता मदत मिळणार असली तरी ती किती मिळणार आणि सर्वांना मिळणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र दिवाळीपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.