Thackeray Brother Yuti : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीला तब्बल अडीच तास लागले आणि या चर्चेमुळे राज्यात शिवसेना (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या दोन पक्षांमधील संभाव्य युतीबद्दल चर्चेला अधिकच वेग आला आहे.
या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) उपस्थित होते, तर मनसेकडून संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हजर होते. मात्र इतक्या मोठ्या बैठकीनंतरही चर्चेचा नेमका अजेंडा अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेला नाही.
कोणते मुद्दे चर्चेत आले असावेत?
अनेक महत्त्वाच्या विषयांवर या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं बोललं जातं. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसे आणि शिवसेना युतीचा. आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता ही बैठक झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच येत्या २ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबतही महत्त्वाची बोलणी झाली असावीत. या मेळाव्याला राज ठाकरे देखील सहभागी होणार का, याबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
तसेच काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्याशी मनसेचा संबंध जुळतो का, या संदर्भातही विचारविनिमय झाला असल्याचे समजते. कालच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी बैठक घेतली होती, त्यानंतर या चर्चेचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे.
पुढचा मार्ग कोणता?
जर शिवसेना आणि मनसे एकत्र आले, तर हे बंधू पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात खांद्याला खांदा लावून उतरतील. मात्र ही युती फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी मर्यादित राहणार की संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार, हा मोठा प्रश्न आहे. काही महापालिकांमध्ये शिवसेना महाविकास आघाडीसोबत लढेल, काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळावरही लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासाठी दुसऱ्या फेरीच्या चर्चेत संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर यांसारखे नेते सामील होणार आहेत. स्थानिक ताकद, जागांची विभागणी आणि मतदारसंघातील समीकरणं पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल.
दसरा मेळावा ठरणार टर्निंग पॉइंट?
शिवतीर्थावरील या बैठकीनंतर सर्वांचं लक्ष आता दसरा मेळाव्याकडे लागलं आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर येऊन युतीची घोषणा करतात का, की अजून काही वेळ खेळ लांबवला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.






