Share

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर ब्रेक फेल झाल्यानं १५ ते २० गाड्यांचा चक्काचूर,अनेकजण जखमी

Mumbai Pune Expressway :  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी एक धडकी भरवणारा अपघात घडला. खोपोली (Khopoli) परिसरातील नवीन बोगद्यापासून फूडमॉल हॉटेल (Foodmall Hotel) दरम्यानच्या उतारावर कंटेनरच्या ब्रेकने अचानक काम करणे थांबवलं आणि त्यातून हा मोठा अपघात घडला.

या अपघातात कंटेनर थेट पुढे असलेल्या सुमारे १५ ते २० गाड्यांवर आदळला. चारचाकी वाहनं, खासगी प्रवासी गाड्या आणि काही मालवाहू ट्रक यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अनेक गाड्यांमध्ये गंभीर नुकसान झालं असून काहींचं रूपांतर लोखंडी ढिगाऱ्यात झालं आहे.

सुदैवानं, या भीषण अपघातात कुणाचाही जीव गेला नाही. मात्र, अनेक प्रवासी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या जखमांनी त्रस्त झाले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, खोपोली पोलिस (Khopoli Police) आणि महामार्ग सुरक्षा दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य आणि बचाव कार्य सुरू आहे.

अपघात घडलेल्या जागेवर अत्यंत तीव्र उतार असून, अशा ठिकाणी ब्रेक फेल होणं हे फारच धोकादायक ठरतं. त्यामुळे एकामागून एक गाड्या एकमेकांवर आदळत गेल्या आणि संपूर्ण मार्गावर गोंधळ उडाला. वाहनांच्या काचा फुटल्या, धुरळा उडाला आणि प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झालं.

या अपघातामुळे मुंबई लेन (Mumbai Lane) वर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहतूक पोलिस (Traffic Police) अपघातग्रस्त गाड्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी काही वेळासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now