मोठी बातमी! नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यावर आलेले कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे आता राज्यातील मंदिरे सुरू करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून याबाबत आंदोलने केली जात होती.

सध्या बाजारपेठा आणि मॉल सुरू झाले आहे. मात्र मंदिरे बंद होती. अखेर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली करण्यात येणार आहेत, मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. तरच कोरोना पूर्णपणे नाहीसा होईल. मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर केला पाहिजे.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची मोठी जबाबदारी आहे, हे विसरू नये, असे म्हटले आहे. आता हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल, असेही ते म्हणाले.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. लवकरच शाळा देखील सुरू होणार आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. यामुळे आता तरी मंदिरे सुरू करा अशी मागणी भाजपकडून केली जात होती. याबाबत राज्यभरात आंदोलने देखील करण्यात आली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आज हा निर्णय घेतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.