…अन् जमीन खोदत असताना त्याला मिळाले ५ किलो सोन्याचे दागिने

 

देणे वाला जब भी देता देता छप्पर फाड के, असेच काहीसे झाले आहे तेलंगणाच्या एका शेतकऱ्याबरोबर. या शेतकऱ्याने एक महिन्यापूर्वीच एक ओसाड जमीन खरेदी केली होती, आता तीच जमीन खोदत असताना त्याला ५ किलो सोने मिळाले आहे.

तेलंगणाच्या जनगाव जिल्ह्यात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव नरसिंग असे आहे. नरसिंग यांनी एक महिन्यात पूर्वीच ही ११ एकर जमीन खरेदी केली होती, आता त्यानंतर जेव्हा त्यांनी या जमिनीच्या लेव्हलचे काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा आता त्यांना हे ५ किलो सोने सापडले आहे. त्यांना सापडलेल्या या दागिन्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला ५ किलो सोन्याचे दागिने सापडले आहे, याची बाजारात किंमत २ कोटी रुपये इतकी आहे, मात्र हे सर्व दागिने अँटिक असल्याने त्याची खरी किंमत सांगणे कठीण झाले आहे.

नरसिंग यांना सोन्याचे दागिने मिळाल्याची बातमी गावात चांगली पसरल्याने गावातल्या लोकांनी हे दागिने पाहण्यासाठी गर्दी केली होती, तसेच ही गोष्ट कळल्यानंतर तिथे पोलिसांसोबतच महसूल अधिकारीही आले आणि त्यांनी हे सर्व सोने ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हा खजिना काकतीयसाम्राज्याच्या काळातील असल्याचे म्हटले जात आहे. आता हा खजिना जर ऐतिहासिक निघाला तर शेतकऱ्याला याचा काही भाग बक्षीस म्हणून मिळणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.