Telangana Dentist Dr Pratyusha ends life : तेलंगणा (Telangana) राज्यातील हनमकोंडा (Hanamkonda) जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आलीय. हसनपार्थी (Hasanparthy) परिसरात राहणाऱ्या प्रत्युषा नावाच्या 28 वर्षांच्या तरुणीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. डॉक्टर असलेल्या नवऱ्याचे एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत संबंध असल्याचा संशय आणि त्यातून सुरू झालेला मानसिक छळ… अखेर तिने आयुष्यच संपवलं.
काय घडलं नेमकं?
डॉ. प्रत्युषा ही एक खाजगी हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट होती. 2017 साली तिचं लग्न डॉ. अल्लादी सृजन (Alladi Srujan) यांच्याशी झालं, जे हनमकोंडातील प्रसिद्ध हार्ट सर्जन आहेत. लग्नावेळी प्रत्युषाच्या कुटुंबाने 30 लाख रुपये, 30 तोळे सोनं आणि महागडी कार दिली होती. त्यांची दोन मुलं आहेत आणि दोघं हसनपार्थी परिसरात राहत होते.
इन्फ्लुएंसरशी नवऱ्याचे संबंध?
डॉ. सृजन यांची ओळख श्रुती उर्फ बुट्टा बोम्मा (Shruti alias Butta Bomma) या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत झाली. सुरुवातीला इंस्टाग्रामवरील एका मुलाखतीतून ओळख झाली आणि नंतर संबंध प्रकरणात रूपांतरित झाले, अशी माहिती मिळालीये.
डॉ. प्रत्युषा हिने नवऱ्याला हे सर्व समजल्यावर थेट कुटुंबासमोर जाब विचारला. पण सृजनने वागणं बदललं नाही, उलट तिच्यावर हात टाकला. सासरच्यांकडूनही तिला अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे प्रत्युषा प्रचंड मानसिक तणावात होती.
उचललं टोकाचं पाऊल
सोमवारी सकाळी, पती आणि दोन मुलं घरात असतानाच प्रत्युषा हिने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी डॉ. सृजन आणि इन्फ्लुएंसर श्रुतीविरोधात थेट पोलिसांत तक्रार केलीय. पोलिसांनी डॉ. सृजन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदवण्यात आलाय.
या धक्कादायक घटनेमुळे हनमकोंडा परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. एक सुशिक्षित, स्वावलंबी महिला, जी स्वतः डॉक्टर होती, तिनं वैवाहिक धोका, मानसिक छळ सहन करत शेवटी जीवन संपवलं. ही घटना समाजाच्या विवेकाला हादरा देणारी आहे.