Homeताज्या बातम्यासिंधूताईंची भूमिका करणारी अभिनेत्री माईंच्या निधनानंतर कोलमडली; म्हणाली घरातलं कुणी गेल्यावर..

सिंधूताईंची भूमिका करणारी अभिनेत्री माईंच्या निधनानंतर कोलमडली; म्हणाली घरातलं कुणी गेल्यावर..

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचं काल ४ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सिंधूताई यांचं महिन्याभरापूर्वी हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, उपचार सुरु असतानाच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली असून अनेकजण त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर सिंधूताईंचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस. पोस्ट नाही केलं? पटकन judge करतो ना आपण त्यांच्या social media वरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली’.

‘रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी confirm झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता प्रतिक्रियेसाठी. काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले. कारण ती वेळ खरंच नाजूक होती’.

‘माई आणि मी रोज संपर्कात होतो का? तर नाही. पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं’.

‘चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता ‘बाळा’ म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या ‘मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस’.

‘अभिनेत्री’ म्हणून, एक तेजस्विनी पंडित आहे बरंका. इथे अशी ओळख मला ‘मी सिंधुताई सपकाळ’ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारीचा का असेना पण मला वाटा उचलता आला’.

‘आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई’.

‘महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील’.

‘लोकहो एक विनंती…. घाई घाईने RIP लिहिण्याच्या ह्या जगात, त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे), ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death’.

‘तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना की माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदनच्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो. ओम शांती. माई….’

महत्त्वाच्या बातम्या : 

बालविवाह झाल्यानंतर गर्भवती असताना पतीने घराबाहेर काढले, नंतर झाल्या १५०० मुलांच्या आई
सिंधूताईंच्या निधनाने पंतप्रधान मोदींना अतिव दुख:; पहा श्रद्धांजली वाहताना काय म्हणाले..
त्यावेळी मला रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते; वाचा स्वत: सिंधूताईंनी सांगीतलेला दर्दनाक किस्सा