Tejaswini Pandit on Raj Thackeray : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या तिच्या आगामी ‘येरे येरे पैसा ३’ (Yere Yere Paisa 3) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली असली, तरी ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि राजकीय भूमिकेमुळेही चर्चेत आहे. नुकतीच ती एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत खास मत व्यक्त केलं. तिच्या म्हणण्यानुसार, “राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आपला महाराष्ट्र खूपच भारी होईल.”
राज ठाकरे यांचं कौतुक करत तेजस्विनी म्हणाली…
“त्यांचं व्हिजन फारच सकारात्मक आणि स्पष्ट आहे. मी वैयक्तिकरित्या अनेक वेळा त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांच्या विचारांतून मला जाणवलं की त्यांनी महाराष्ट्राला त्यांच्या कुटुंबापेक्षाही जास्त महत्त्व दिलं आहे. हे फार मोठं आहे. असं नेतृत्व राज्याला नक्कीच पुढे नेऊ शकतं,” असं तेजस्विनी पंडित म्हणाली.
पूर्वीचं आणि आताचं राजकारण वेगळं…
पुढे बोलताना तेजस्विनी म्हणाली, “पूर्वीच्या काळातील शरद पवार (Sharad Pawar), नितीन गडकरी (Nitin Gadkari), विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांसारख्या नेत्यांचं भाषण ऐकणं म्हणजे वेगळीच अनुभूती असायची. त्यांचे विचार, वक्तृत्व आणि अभ्यास अगदी वेगळा होता. त्या काळात राजकारणात ग्रेस आणि नैतिकता होती. आज तसं काही उरलेलं दिसत नाही.”
राजकारणात येण्याबद्दल तेजस्विनीचं मत
तिला जेव्हा विचारण्यात आलं की ती स्वतः कधी राजकारणात उतरणार का, यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझा फारसा अभ्यास नाही, पण मी राजकारण फॉलो करते. मला वाटतं समाजासाठी काम करायचं असेल, तर राजकारणातच यावं लागेल असं नाही. लोकांनी याकडे करिअर म्हणून बघायला हवं. सध्या मी अभिनय क्षेत्रात समाधानी आहे आणि एक अवघड क्षेत्र सांभाळताना दुसऱ्या अवघड क्षेत्रात प्रवेश करायचा विचार नाही.”
राजकीय वर्तुळात न राहता एका कलाकाराने राजकारणावर मांडलेली मतं, तिच्या जाणिवा आणि अभ्यास दर्शवतात. सामाजिक प्रश्नांवर ती ज्या पद्धतीने बोलते, त्यातून तिची संवेदनशीलता आणि स्पष्टवक्ता स्वभाव अधोरेखित होतो.






