Tanushree Dutta On Nana Patekar: भारतात #MeToo मोहिमेची नांदी करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने पुन्हा एकदा अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका इंस्टाग्राम व्हिडीओद्वारे ती अत्यंत भावनिक स्वरात म्हणते की, गेल्या चार ते पाच वर्षांपासून तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने मुलाखत देत धक्कादायक खुलासे केले आहेत.
“गँगस्टरशी संबंध…”
तनुश्री दत्ताने स्पष्टपणे सांगितले की, “नाना पाटेकर आणि त्याच्या गँगने (gang) माझा छळ सुरू केला आहे. त्याचे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी (gangsters) संबंध आहेत. तो ‘मराठी माणूस’ म्हणून सहानुभूती मिळवत आहे. पण हे सहानुभूतीचे कवच माझ्यासाठी धोकादायक ठरले आहे.”
“माझ्यावर पाळत ठेवली जातेय, कामांमधून बाहेर काढले जातेय”
2018 नंतर माझ्या आयुष्यात अनेक विचित्र घटना घडल्या. कुणीतरी माझ्यावर सतत नजर ठेवत होते, मी कुठे जातेय, काय करतेय याची माहिती त्यांना आधीच असायची. 2020 नंतर मला सिस्टिमॅटिक पद्धतीने मोठ्या प्रोजेक्ट्समधून बाजूला केले गेले. फोन, ईमेल हॅक केले गेले, त्यामुळे माझी वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. माझ्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या, असं ती म्हणाली.
“घरात घरकामगारद्वारे विष देण्याचा प्रयत्न, अपघात घडवला”
2022 मध्ये मी उज्जैनला गेले कारण माझ्या घरात नेमून दिलेला एक घरकामगार (house helper) मला जेवणात काहीतरी मिसळून आजारी पाडत होता. तिथेच माझा अपघात झाला. रिक्षाचे ब्रेक कुणीतरी फेल केले होते. या घटनेनंतर मला खात्री पटली की, हा फक्त योगायोग नाही. मला मारण्याचा प्रयत्न चाललाय.
“सुशांतसिंग राजपूतसारखाच अनुभव… पण मी जिवंत आहे”
तनुश्री दत्ता म्हणाली की, “जे काही सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) सोबत घडले, अगदी तेच माझ्याबरोबर घडतेय. फक्त फरक इतकाच की, तो गेला आणि मी अजून जिवंत आहे. मी त्याची संपूर्ण केस वाचली आहे, अभ्यास केला आहे.”
“नाना पाटेकर माझ्या स्टारडमवर जगला”
2008 मध्ये मी बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होते. त्या वेळी नाना पाटेकरकडे कोणतीही प्रमुख भूमिका नव्हती. निर्माते माझ्याकडे येऊन म्हणत, ‘तुम्ही ही फिल्म केलीत तरच विकली जाईल’. माझ्या लोकप्रियतेचा फायदा घेत नानाने आपलं बुडत चाललेलं करिअर उभं करण्याचा प्रयत्न केला.
“मी जेव्हा यांच्यावर लैंगिक छळाचा (MeToo) आरोप केला, तेव्हा त्यांच्यात एवढा अहंकार होता की, त्यांनी ठरवलं की, मला संपवायचं. कारण इथे जर एखादा बाहेरून आलेला मरतो, तरी एक गुन्हेगार ‘मराठी माणूस’ असेल तर त्याला पोलिस आणि नेत्यांचा पाठिंबा मिळतो,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.
कोण आहे तनुश्री दत्ता?
तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने 2004 मध्ये ‘मिस इंडिया’ (Miss India) स्पर्धा जिंकून ग्लॅमर वर्ल्डमध्ये पदार्पण केले. तिचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झाला असून, तीने ‘एसएसएसएसएच’ (Sssshhh…) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. 2018 मध्ये तिने #MeToo मोहिमेच्या माध्यमातून नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत सर्वांना हादरवून सोडले.