Tamhini Ghat Thar Accident: पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे (Kondhwe) इथून सहा तरुण थार गाडी घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले, पण रायगड (Raigad District) येथील ताम्हिणी घाटात त्यांच्यावर काळाचा घाला कोसळला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात सर्वच तरुणांचा मृत्यू झाला असून दरी तब्बल 500 फूट खोल असल्याने रेस्क्यू ऑपरेशन अधिक कठीण झालं. या अपघातात प्राण गमावणाऱ्यांमध्ये साहिल गोठे (Sahil Gothe), शिवा माने (Shiva), प्रथम चव्हाण (Pratham Chavan), श्री कोळी (Shree Koli), ओमकार कोळी (Omkar Koli) आणि पुनीत शेट्टी (Punit Shetty) यांचा समावेश आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्था (Sahyadri Wildlife Rescue Group) आणि स्थानिक पोलीस दलाकडून सुरू आहे. आतापर्यंत चार मृतदेह मिळाले असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. पोलीस याला अत्यंत संवेदनशील प्रकरण मानून तपास पुढे नेत आहेत.
साहिल गोठेचा संघर्ष आणि उभा केलेला व्यवसाय
या सहा मित्रांमध्ये सर्वांचा जीव ओढवला, पण साहिल गोठे (Sahil Gothe) याची मेहनत विशेषत्वाने लोकांच्या चर्चेत आहे. आपल्या घरचा भार हलका करण्यासाठी त्याने पुण्यात मोमोजचा छोटा व्यवसाय सुरू केला. मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्याने तब्बल तीन ठिकाणी मोमोजच्या गाड्या चालू केल्या.
या व्यवसायातून त्याचे उत्पन्न हळूहळू वाढू लागले आणि त्याचाच आधार घेत त्याने गेल्या वर्षी स्वतःचा छोटासा फ्लॅट खरेदी केला. अवघ्या महिनाभरापूर्वीच त्याने स्वप्नातील थार गाडी घेतली होती. पण हीच गाडी त्याच्या मित्रांसह जीव घेणारी ठरली.
कोकण सफरीचं स्वप्न एका क्षणात चिरडून गेलं
या सहाही तरुणांनी मंगळवारी पहाटेच कोकणात फिरण्यासाठी प्रस्थान केलं होतं. ताम्हिणी घाट हा नेहमीच कठीण वळणांचा आणि सतत दगडांनी भरलेल्या रस्त्यांचा आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, एका तीव्र वळणावर अंदाज चुकल्याने वाहनचालकाचं नियंत्रण सुटलं आणि थार थेट खोल दरीत कोसळली.
घाटातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी यापूर्वीही अशाच धोकादायक अपघातांची नोंद केली आहे. स्थानिक प्रशासनाने आता प्रवाशांना अधिक सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अपघातप्रवण ठिकाणी चेतावणी फलक, स्पीड मर्यादा व सुरक्षेची उपाययोजना वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






