Uddhav Thackeray : नुकतीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये युती झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी ही घोषणा केली. यावर भाजप खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार वार केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यामध्ये दम नाही. तसं असतं तर ते घरी बसले नसते,” अशी टीका नवनीत राणांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांना खडे बोल सुनावले आहेत.
“आमच्याकडे भटकंती करणाऱ्या लोकांसाठी एक म्हण आहे. ‘याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार’ असे करत उगाचंच हनुमान चालीसा म्हणत दारोदार फिरण्यापेक्षा कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये महाराष्ट्रात थांबून महाराष्ट्रातल्या लोकांचे जीव वाचवण्याचं अत्यंत पुण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, असा घणाघाती प्रहार सुषमा अंधारेंनी नवनीत राणांवर केला आहे.
तसेच गुजरात, गुवाहाटी, डोंगर, झाडी असं करत फिरायला त्यांचं काही टुरिंग टॉकीज नव्हतं. उद्धव ठाकरेंमध्ये दम आहे की नाही असं ज्यावेळी राणाजी म्हणतात त्यावेळी मला त्यांच्याबद्दल अपार करुणा वाटते, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
पुढे बोलताना, “१०५ आमदार, ४० बंडखोर, एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि आसाम, गुजरात, गोवा या तीन राज्यांची गृहमंत्रालये, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि हजारो लावारीस पेड ट्रोलर्स या सगळ्या लोकांना मागच्या तीन महिन्यांपासून ज्यांनी कामाला लावलंय त्यांचं नाव उद्धव ठाकरे आहे नवनीत मॅडम,” असे म्हणत सुषमा अंधारेंनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाचा वाद सुरु आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांचे एकमेकांवर सतत टीकास्त्र सोडणे सुरु आहे. यातच सुषमा अंधारेंच्या या वक्तव्यावर नवनीत राणा काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Sonali Phogat : सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, आणखी दोन जणांना अटक, धक्कादायक माहिती आली समोर
‘आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही’; रवी राणांवर पलटवार करताना बच्चू कडूंची जीभ घसरली
छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नेमकं काय घडलं?
Tea : ३९ वर्षांपासून दिवसभरात केवळ दोन कप चहा घेऊन जिवंत आहेत ‘साध्वी’, डॉक्टरही संभ्रमात