Sushma andhare on Amruta Fadnavis : मुंबईत (Mumbai City) सध्या पुन्हा एकदा राजकारण आणि वेशभूषा या विषयावरून वादंग माजलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या एका फोटोंवरून सोशल मीडियात चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मोठं भाष्य करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये दोन वर्षांपूर्वीची आठवण करून दिली. त्यावेळी भाजप (BJP) नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या ड्रेसिंगवर सातत्याने आक्षेप घेतले होते. त्याचाच दाखला देत अंधारेंनी आता अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अंधारेंच्या म्हणण्यानुसार, अमृता फडणवीस यांनी आपल्या राहणीमान, व्यवसाय निवड आणि वेशभूषेत दाखवलेला बेदरकारपणा हा इथल्या सनातनी संस्कृतीला दिलेला मोठा धक्का आहे. तथाकथित संस्कृती रक्षक यामुळे पुरते जखमी झाले असून त्यांचा विरोध लुळा- पांगळा ठरला आहे. त्यांनी मनोहर कुलकर्णी (Manohar Kulkarni) यांच्यासारख्या व्यक्तींच्या तथाकथित संस्कृती रक्षणाच्या दाव्यालाही चिरडून टाकल्याचं स्पष्ट केलं.
सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा जुना मुद्दा पुढे आणला. “मी साडी नेसते, पण इतरांनी माझ्यासारखंच कपडे घालावे असा अट्टाहास नाही. प्रत्येकाला आपापल्या व्यवसाय आणि सोयीप्रमाणे पेहराव करायचा अधिकार आहे. टेनिस खेळणारी महिला साडी नेसून खेळणार नाही, आणि मी शिक्षिका असल्याने माझ्या कामाशी सुसंगत कपडे घालते,” असं त्यांनी नमूद केलं.
यावेळी त्यांनी उर्फी जावेदवर होणाऱ्या हल्ल्यांवरूनही प्रश्न उपस्थित केले. उर्फी अल्पसंख्याक समुदायातील असल्यामुळे तिच्यावर होणाऱ्या टीकांचा सूर वेगळा असतो, असं अंधारेंचं म्हणणं आहे. “जर वेशभूषेवरच आक्षेप घ्यायचे असतील तर कंगना रणौत (Kangana Ranaut), केतकी चितळे (Ketaki Chitale) किंवा अमृता फडणवीस यांच्या कपड्यांवरही आक्षेप का घेत नाही?” असा सवालही त्यांनी केला.
शेवटी अंधारेंनी ठामपणे लिहिलं की, “नंगटपणा हा कपड्यांमध्ये कमी आणि विचार-भाषेत जास्त असतो. जनतेच्या खरीखुरी समस्या सोडून राजकारणी आणि संस्कृती रक्षक अशा विषयांतून लोकांचं लक्ष भरकटवत आहेत.”