Share

Raj Thackeray and Uddhav Thackeray : मोठी बातमी: अमराठी मतदार ठरणार गेमचेंजर, भाजप-शिंदेसेनेला भरघोस मतांचा अंदाज; नव्या सर्व्हेत कुणाला धाकधूक?

Raj Thackeray and Uddhav Thackeray : मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीची धग जाणवू लागली आहे. मुंबई महानगरपालिका (Mumbai) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना, प्रचाराचा रणसंग्राम आता प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ताकद पणाला लागलेली ही लढाई अस्तित्वाची मानली जात आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना – शिंदे गट (Eknath Shinde) यांनी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच, असा ठाम निर्धार केल्याचं चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर AsceIndia या संस्थेने जाहीर केलेल्या नव्या सर्व्हेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या सर्व्हेनुसार मराठी मतदारांचा मोठा वर्ग ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकलेला असला, तरी अमराठी मतदारांचा कौल भाजप-शिंदे गटाच्या बाजूने जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा महायुतीचा महापौर बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या सर्व्हेबाबत माहिती देताना AsceIndia संस्थेचे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी सांगितले की, 2017 साली मुंबईत सुमारे 55 टक्के मतदान झालं होतं. यंदाही मतदानाची टक्केवारी याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. मतदानाची ही आकडेवारी पाहता, भाजप-शिवसेना युतीला एकूणच फायदा होईल, असं संकेत या सर्व्हेतून मिळत आहेत.

सर्व्हेनुसार मराठी मतदारांमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांना चांगला पाठिंबा मिळत असला, तरी तो सत्ता मिळवण्यासाठी पुरेसा ठरणार नाही, असं चित्र आहे. दुसरीकडे अमराठी मतदार मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिंदे गटाकडे झुकताना दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीचा ‘गेमचेंजर’ घटक म्हणून अमराठी मतदारांकडे पाहिलं जात आहे.

या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार मराठी मतदारांमध्ये भाजप-शिवसेनेला 42 टक्के, ठाकरे गट-मनसेला 44 टक्के, काँग्रेसला 4 टक्के, तर इतरांना 11 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. मुस्लीम मतदारांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून तिला 41 टक्के मतं मिळू शकतात, तर भाजप-शिवसेनेला 11 टक्के आणि ठाकरे गट-मनसेला 28 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्वात निर्णायक ठरणाऱ्या अमराठी मतदारांमध्ये भाजप-शिवसेनेला तब्बल 53 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. ठाकरे गट-मनसेला येथे केवळ 15 टक्के, काँग्रेसला 19 टक्के, तर इतर पक्षांना 13 टक्के मतं मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या सत्ताकारणात अमराठी मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू मुंबईत आपलं राजकीय अस्तित्व कितपत टिकवतात आणि भाजप-शिंदे गटाचा सत्ता काबीज करण्याचा डाव किती यशस्वी ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now