Share

Suresh Kalmadi : पुण्याचा ‘सबसे बडा खिलाडी’ गेला, माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. त्यांच्या निधनाने पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. पुण्याचा ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ म्हणून ओळखला जाणारा कलमाडी हे आपल्या काळात पुणे शहराच्या राजकारणाचे प्रतीक ठरले.

कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत कलमाडी हाऊस (Kalmadi Residence Pune) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी (Vaikunth Crematorium Pune) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुण्यातील अनेक माजी व वर्तमान राजकीय नेते, तसेच समर्थक अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन कन्या, जावई आणि नातवंडांचा परिवार आहे.

सुरेश कलमाडी कोण होते?


सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मधून पूर्ण केले आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College Pune) मध्ये प्रवेश घेतला. १९६० मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला आणि १९६४ मध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जोधपूरमधील फ्लायंग कॉलेज मध्ये दाखल झाले. १९५४ ते १९७२ या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली.

१९७८ मध्ये कलमाडी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९८२ मध्ये ३८ वर्षांच्या वयात त्यांनी खासदारकीसाठी निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर सलग ३० वर्षे ते खासदार राहिले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव (P.V. Narasimha Rao) यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणूनही त्यांनी कार्य केले.

२०१० पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला काही अडथळे आले. कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणात विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला, तसेच त्यांना ९ महिने तुरुंगवास भोगावा लागला.

एक काळ असा होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण मानले जायचे. पुणे महापालिका त्यांच्या गटाच्या ताब्यात होती, तसेच शहरातील महत्वाचे निर्णयही कलमाडी हाऊसमधूनच घेतले जात. कर्वेरोडजवळील दोन मजली कलमाडी हाऊस हे सत्तेचे केंद्र मानले जायचे. कार्यकर्ते तिथं जमायचे आणि कलमाडी विमानतळावर येत असताना त्यांचं स्वागत जत्रेसारखं भरायचं.

कलमाडी आपल्या केबिनमध्ये झुलत्या खुर्चीत बसून संपूर्ण राजकीय सूत्रं हलवायचे, पदांचे वाटप करत राजकारणाचं नियोजन करत. त्यांच्या काळातल्या पुणे फेस्टिव्हल्स हे शहरातल्या मनोरंजन आणि सांस्कृतिक अनुभवांचे शिखर मानले जात असे. त्याच फेस्टिव्हलमध्ये हेमा मालिनी, अमरीश पुरी, गुरुदास मान, जगजीत सिंग यांसारखी प्रतिष्ठित व्यक्तीही उपस्थित असायची.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now