Suraj Chavan : टिकटॉक स्टारपासून अभिनेता होण्यापर्यंतचा सूरज चव्हाणचा प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीच्या एका खेड्यातून आलेल्या सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं धाडस केलं ते प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी. मात्र या निर्णयावरून त्यांना चांगलीच टीका झेलावी लागली. काही कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली होती.
“झापुक झुपूक” या चित्रपटातून सूरजला(Suraj Chavan) लाँच करण्यात आलं. सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असला तरी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर थेट प्रेक्षकांशी संवाद साधला आणि टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.
‘नकारात्मकतेमागे ठरवलेली मोहीम’
शिंदे म्हणाले, “काही लोकांनी आधीच ठरवलं होतं की सूरजचा सिनेमा चालू द्यायचा नाही. सोशल मीडियावर अशा क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत, ज्यात थिएटरमध्ये केवळ दोन-तीन प्रेक्षक असल्याचं दाखवलं जातंय. पण हे सगळं शो सुरू होण्याआधीच चित्रीत केलं जातंय. काही युट्यूबर्स आणि व्हिडिओ क्रिएटर्सनी ठरवून ही नकारात्मकता पसरवली आहे.”
‘पहिल्यांदा सिनेमा बघा, मग मत द्या’
“फक्त ट्रोलिंग करून, एखाद्याला कमी लेखून काही साध्य होत नाही. सूरज एक नवोदित कलाकार आहे. त्याच्यावर मेहनत घेतली आहे. तुम्ही आधी चित्रपट बघा, मग बोला. जर काही कमी-जास्त वाटलं तर जरूर सांगा. पण फुकटात कुणालाही वाईट म्हणू नका,” असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं.
‘युट्यूबर्सची यादी तयार करा!’
केदार शिंदेंनी एका युट्यूबरचा उल्लेख करत सांगितलं की, “कोणी तरी लिहिलं होतं, ‘केदार शिंदेंनी(KEDAR SHINDE) जिओ सिनेमाला चुना लावला.’ त्यांना माहिती नाही, आम्ही एका चित्रपटासाठी किती मेहनत घेतली आहे. मी टीमला सांगितलं आहे की, अशा युट्यूबर्सची यादी तयार करा. पुढच्या सिनेमाच्या शूटिंगला त्यांनाही घेऊन जाईन, म्हणजे त्यांना प्रत्यक्षात समजेल की चित्रपट बनवणं किती कठीण असतं.”
शेवटी त्यांनी स्पष्ट केलं की, हे सगळं एक पूर्वनियोजित प्रयत्न होता — सूरज चव्हाणसारख्या नवोदित कलाकाराचा सिनेमा चालू द्यायचा नाही, असं काही लोकांनी ठरवून टाकलं.
“झापुक झुपूक”च्या निमित्ताने सूरजचा पहिला सिनेमा प्रकाशझोतात आला असला, तरी त्याच्या प्रवासाची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे — आणि केदार शिंदेंच्या पाठबळामुळे तो नक्कीच पुढे जाईल,” असा विश्वास काही चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.
suraj-chavans-film-would-flop-some-people-have-already-decided-this