Suraj Chavan : राजकारणात एखाद्याविरोधात तात्काळ कारवाई झाली तरी ती किती टिकते हा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. कारण, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या तत्कालीन कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या कार्यकर्त्याला चोप देणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांचे फक्त महिन्याच्या आतच राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या चव्हाण यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP Party) प्रदेश सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली.
ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), आदिती तटकरे (Aditi Tatkare), नवाब मलिक (Nawab Malik) आणि समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्याकडून चव्हाण यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.
घटना कशी घडली?
पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) मोबाईलवर रमी खेळताना दिसल्याने विरोधक आक्रमक झाले. अनेक ठिकाणी निदर्शने झाली. दरम्यान, लातूर (Latur) येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आले असताना, छावा संघटनेचे (Chhava Sanghatana) पदाधिकारी तिथे दाखल झाले.
त्यातील प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे (Vijay Ghadge) यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागत तटकरे यांच्या समोर पत्ते फेकून आंदोलन केलं. यामुळे संतापलेल्या सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह घाडगे यांच्यावर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांसह कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारहाण करण्यात आली.
तातडीची कारवाई आणि हकालपट्टी
ही घटना 20 जुलै रोजी घडली. दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चव्हाण यांना बोलावून युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. त्या वेळी पक्षातून संदेश गेला की चुकीचं वर्तन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल.
महिन्याभरातच पुनर्वसन
मात्र, कारवाईला महिनाही उलटला नाही तोच सूरज चव्हाण यांना पुन्हा पद देण्यात आलं. यावेळी त्यांना पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली. यामुळे पूर्वीची हकालपट्टी ही केवळ दिखाव्यापुरतीच होती का, असा प्रश्न आता कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.