Suraj Chavan : लातूर (Latur) येथे घडलेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) युवक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि छावा संघटना (Chhava Sanghatana) आमनेसामने आले आहेत. रविवारी घडलेल्या एका प्रकारात सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
नेमकं काय घडलं?
लातूरमधील एका कार्यक्रमादरम्यान छावा संघटनेचे कार्यकर्ते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या विरुद्ध आंदोलन करत होते. आरोप होता की, कोकाटे हे सभागृहात बसून ऑनलाईन जुगार खेळत होते. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे (Sunil Tatkare) लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. तेव्हा संतप्त छावा कार्यकर्त्यांनी टेबलवर पत्ते उडवत निषेध व्यक्त केला.
याच वादातून सूरज चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील (Vijay Ghadge Patil) यांच्यासह काही कार्यकर्त्यांना मारहाण केली. या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं असून, छावा संघटना आक्रमक झाली आहे.
सूरज चव्हाण यांनी मागितली माफी
सोमवारी सूरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ जाहीर करून माफी मागितली. त्यांनी सांगितलं की, कोणत्याही शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्याला ते पाठिंबा देतात. मात्र काही अपशब्द वापरण्यात आले म्हणून त्यांच्याकडून प्रतिक्रीया आली आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. लवकरच ते विजय घाडगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
तटकरे दौऱ्यातून वगळण्याचा निर्णय
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सूरज चव्हाण यांना तात्पुरत्या स्वरूपात सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून वगळण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई सावधगिरीचा उपाय म्हणून करण्यात आली आहे, कारण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढलेला आहे. या प्रकरणाचे पडसाद धाराशिव (Dharashiv) आणि इतर भागांतही उमटू लागले आहेत.
लातूर बंद
छावा संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष विजयकुमार घाडगे (Vijaykumar Ghadge) यांना मारहाण झाल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. संघटनेने आज लातूर बंदची हाक दिली आहे. तसेच, परवा संपूर्ण लातूर जिल्हा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं असून, विविध पक्षांनीही यास समर्थन दिलं आहे.
संघटनेचा ठाम आग्रह आहे की, सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.