Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात विवाहसोहळा पार पाडला. या सोहळ्यास अनेक मान्यवरांसह अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhvi Killekar) हीही उपस्थित होती. लग्नानंतर मात्र सोशल मीडियावर सूरजविषयी एक नवा वाद उफाळून आला आहे.
बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपी दादा (DP Dada) यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी सूरजवर नाराजी व्यक्त करत काही मुद्दे स्पष्ट केले.
सूरजचं नवीन घर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मदतीने बांधून देण्यात आलं होतं. या घरासाठी सोफासेट देण्याचं आश्वासन धनंजय पोवार यांनी सूरजला पूर्वीच दिलं होतं. दीड महिना आधी सूरजने सोफासेटबद्दल चौकशीही केली होती. त्यावेळी डीपी दादांनी त्याला मॉडेल निवडण्यासाठी यायचं का, हॉलचं माप काय, फोटो पाठव अशी माहिती मागितली होती.
परंतु त्यानंतर सूरजकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न मिळाल्याचा दावा धनंजयने व्हिडिओमध्ये केला. त्याच्या म्हणण्यानुसार, पुण्यात त्यांनी खास सोफा बनवून ठेवला होता, मात्र लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत सूरजने त्यांना नवी माहिती दिली नाही. शेवटी सूरजने बाहेरून फर्निचर घेतल्याचं त्यांना इतरांकडून समजलं.
व्हिडिओमध्ये धनंजय पोवार म्हणाले की, “मी त्याला सोफा देणार होतो, त्यानेच मला संपर्क साधायला हवा होता. तो म्हणतो ‘दादा देणार आहेत’, मग याचा जाब मला का विचारता? त्याने आम्हाला किंमत द्यायला पाहिजे होती. लोकेशन पाठवायलाही त्याने शेवटच्या क्षणी वेळ लावला. जर त्याला माझ्याकडून फर्निचर नको होतं, तर मला आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं.”
धनंजय पुढे सांगतात की त्यांनी ३–४ वेळा फोन करून पत्ता, फोटो, माप विचारलं, पण सूरजकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. “कदाचित आज त्याला कोणीतरी जास्त देतं म्हणून मला विसरला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





