‘प्रदूषण व भ्रष्टाचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मोदींना लिहीले १८ पानी पत्र’

 

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील संभळ जिल्ह्यात दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीची धक्कादायक घटना घडली आहे.

१४ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली आहे. वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार आणि समाजाला त्रास देणाऱ्या काही लोकांना कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

तसेच आत्महत्येपूर्वी दहावीत शिकणाऱ्या या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १८ पानी पत्र लिहले आहे. मंगळवारी तपासादरम्यान हे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे.

पत्रात मुलीने, वाढते प्रदूषण वृक्षतोड आणि वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच तिने पंतप्रधानांना भेटून आपल्याला चर्चा करायची असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

तसेच वाढती लोकसंख्या याबाबत तिने पंतप्रधान मोदींना उपाययोजना करण्यास सांगितले आहे. दिवाळीत वाजवले जाणारे फटाके, होळीत वापरले जाणारे रासायनिक रंगावर तिने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

वयोवृद्धांच्या समस्यांवरही तिने पत्रात लिहले आहे. काही मुले आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात, त्या ठिकाणी मला रहायचेही नाही, असेही तिने पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून या मुलीवर मानसिक उपचार सुरू होते, अशी माहिती तिच्या कुटुंबाने दिली आहे. तसेच हे पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहचावे आणि त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी, अशी आपल्या मुलीची शेवटची इच्छा असल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.