Sudarshan Ghule : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या जबाबांमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, महेश केदार आणि जयराम चाटे यांनी पोलिसांसमोर कबुली दिली असून, त्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीचे तपशील उघड झाले आहेत.
अत्याचार आणि क्रूर मारहाणीचा तपशील
प्राथमिक चौकशीत सुदर्शन घुलेने सांगितले की, आरोपी प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली आणि त्यांच्यावर निर्घृण मारहाण केली. महेश केदारच्या जबाबानुसार, प्रतीक घुलेने सरपंच देशमुख यांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. तसेच, गॅस पाईप, क्लच वायर, प्लास्टिक पाईप आणि फायबर काठ्यांनी त्यांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली.
गाडीत टाकून निर्जन स्थळी नेले
मारहाणीच्या वेळी सरपंच देशमुख रक्ताच्या उलट्या करू लागले. त्यानंतर आरोपींनी त्यांना स्कॉर्पिओ गाडीत टाकले आणि गंगामाऊली साखर कारखान्याच्या पाठीमागील निर्जन स्थळी नेले. तिथे दोन तास त्यांना बेदम मारहाण केली.
दहशत निर्माण करण्यासाठी निर्दय अत्याचार
जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटे याने आरोपींना आदेश दिला होता की, “त्याला असा मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे.” त्या आदेशाचे पालन करत आरोपींनी संतोष देशमुख यांच्यावर अत्याचार केला. प्रतीक घुलेने पाठीवर झोपलेल्या देशमुख यांच्या छातीवर पळत येऊन जोरात उडी मारली.
अंधाराची वाट पाहत, मृतदेह रस्त्याकडेला फेकला
घटनेनंतर आरोपींनी काळेगाव शिरपूर येथील तुरीच्या शेतात थांबून अंधाराची वाट पाहिली. नंतर सरपंच देशमुख यांना कपडे परत घालून, स्कॉर्पिओमध्ये टाकून ते दैठणा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला सोडून पळून गेले. वाशी गावाजवळ पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी स्कॉर्पिओ गाडी सोडून पळ काढला.
या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.