Success Story: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील निघोज (Nighoj) गावातील तरुण शेतकरी राहुल रसाळ (Rahul Rasal) यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून नव्या पद्धतीने शेतीत यश मिळवलं आहे. जैविक खतांची निर्मिती, हवामान केंद्र आणि आधुनिक प्रयोगांचा वापर करत त्यांनी केवळ उत्पादनात वाढ केली नाही, तर लाखोंची बचतही केली आहे. आज त्यांच्या नावावर ६५ एकर शेती असून त्यातील ४० एकर कोरडवाहू जमिनीत त्यांनी बागायती शेती उभी केली आहे.
जैविक शेतीतून बचत आणि उत्पन्नात वाढ
राहुल यांनी शेतातच जैविक खत निर्मिती प्रयोगशाळा उभारली आहे. ते दरवर्षी सुमारे १ हजार टन कंपोस्ट खत तयार करतात. या खतासाठी २०० टन शेणखत, ४०० टन बगॅस, ३०० टन मळी आणि १०० टन पोल्ट्री खत वापरले जाते. या प्रयोगातून गेल्या वर्षभरात त्यांनी दीड लाखांची बचत केली असून रासायनिक खतावरचा खर्च दहा लाखांनी कमी केला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
राहुल यांनी हवामान केंद्र, आरओ प्रकल्प, इसीमीटर, पीएच मीटर, डीसॉल्ट ऑक्सीमीटर यांसारखी अत्याधुनिक साधने वापरून शेतीत अचूक व्यवस्थापन केलं आहे. हवामानातील बदल, आद्रता, तापमान यांचा अभ्यास करून कीड आणि रोगांचं प्रतिबंधात्मक नियोजन ते आधीच करतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच
राहुल रसाळ यांच्या द्राक्ष आणि डाळिंबाचं उत्पादन युरोपात निर्यात होतं. त्यांची शेती आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ब्राझील (Brazil) येथील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिथेही ते सल्लागार म्हणून कार्य करतात.