कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. मात्र याच संकटाचे रूपांतर दीपिका देशमुख यांनी संधीत केलं आणि एक उंच भरारी घेतली.
दीपिका देशमुख एक गृहिणी म्हणून आधी काम करत होत्या मात्र परिस्थितीमुळे त्यांना व्यवसायात उतरावे लागले. पूढे कोरोनाच्या संकटात मास्क बनवण्याचे काम सुरू केले आणि त्यांना याचा चांगलाच फायदा झाला. आज दीपिका देशमुख यांनी ३०० महिलांना रोजगार पण दिला आहे.
लग्नानंतर सुरुवातीला त्या गृहिनीच होत्या. मात्र अचानक आलेल्या त्यांच्या पतीच्या आजारपणामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांचे पती आधी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करायचे, त्यामुळे दीपिका यांनीही सायकल दुरुस्ती करण्यास सुरुवात केली.
सायकल दुरूस्तीचे काम तर दीपिका शिकल्या. पण हे काम करून त्यांना घर सांभाळून पतीच्या औषधांचा खर्च उचलणे कठीण जात होते. त्यामुळे दीपिका यांनी सायकल दुरुस्ती सोबतच एखादा व्यवसाय करावा असे ठरवले.
त्यामुळे त्यांनी लाह्या, बत्तासे आणि दागिने बनवण्याचे काम सुरू केले. ग्राहकांना दागिने आवडायला लागले आणि या दागिन्यांची मागणी वाढत गेली. पुढे त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांनी सूर्योदय बहुउद्देशीय महिला मंडळाची स्थापना केली.
या संस्थेमार्फत अनेक महिला जुळत गेल्या. प्रत्येक महिलेला त्यांच्या कौशल्याप्रामाणे काम देण्यात आले. त्यामुळे चकल्या, पापड्या, कुरडया, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या महिला बनवू लागल्या. तसेच फुलांपासून, हळदी पासून तयार केलेले दागिने त्या बनवू लागल्या.
मात्र दीपिका यांना उंच भरारी घेण्याचा संधी मिळाली ती कोरोनाच्या संकटात. कोरोना संकटात संकटात महिलांचा रोजगार हिसकावला जाणार का? असा प्रश्न पडला असतानाच त्यांना मास्क बनवण्याची कल्पना सुचली.
त्यांनी मास्क बनवण्यास सुरुवात केली असता त्यांच्या मास्कला मोठी मागणी मिळाली. त्यामुळे त्यांनी डिझायनर मास्क बनवण्याच्या कामास सुरवात केली. त्यांनी लॉकडाऊनमध्ये जवळपास सव्वा लाख मास्कची विक्री केली.
मास्कमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकार बनवले त्यात पैठणी मास्क, डायमंड मास्क, नवरीचा मास्क, नवरदेवाचा मास्क अशा अनेक प्रकारचे मास्क त्यांनी बनवले. कोरोना काळात दीपिका देशमुख यांनी ३०० महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले. दीपिका देशमुख यांच्यामुळे अनेक महिला रोजगार मिळाला आहे, तर अनेक महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहे.