Share

सुबोध भावे ‘या’ चित्रपटात साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

छत्रपती शिवाजी महाराजांवरचे हल्ली अनेक चित्रपट येत आहेत. मध्यंतरी चिन्मय मांडलेकरचा ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता, डाॅ. अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप येत्या ५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यात झी स्टुडिओजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाची भर पडली आहे.

झी स्टुडिओजच्या हर हर महादेव या भव्य दिव्य चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता या चित्रपटाचं डिजिटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत.

हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य सिनेमा मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे.

येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे हे विशेष. हर हर महादेव चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे होय.

या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

त्यामुळे अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असं मी मानतो, असे सुबोध भावे म्हणाला. तसेच म्हणाला, एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानात्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते, माझ्यासाठी ‘ड्रीम रोल’ असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now