राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू! लवकर अर्ज भरा; कारण मुदत फक्त…

 

यवतमाळ | तीन वर्षांपूर्वी घोषित केलेली शिक्षक भरती न्यायालयीन कचाट्यातून सुटल्यानंतरही कोरोनाच्या संकटामुळे अडकली होती, मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.

या भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ९ ऑगस्टला राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय नियुक्ती करण्यात येणाऱ्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तसेच ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी हजारो उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रेही प्रदान केली होती.

मात्र त्यानंतर मुलाखतीसह नियुक्तीचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रलंबित राहिलेली होती. त्यानंतर झालेला सत्ताबदलामुळे आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे पुढची प्रक्रिया अपूर्णच राहिली.

त्यातच कोरोना संकटामुळे वित्त विभागाने ४ मे रोजीच्या निर्णयानुसार भरती प्रक्रियेवर बंदी आणली होती. मात्र आता ठप्प पडलेल्या पवित्र पोर्टलला पुन्हा एकदा गती आली आहे.

गुरुवारी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करून देण्यात आली आहे. त्यासाठी ३१ आॅगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.