Share

Farmer Success Story : कार्तिकची कमाल ! ‘हे’ 12 रूपयांचं फळ विकतोय 800 रुपयांना, आज करतोय तब्बल 1.5 कोटींची कमाई

Farmer Success Story : शेती करताना हातातोंडाशी भांडण करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या जगण्यात बदल घडवण्याचा मोठा ध्यास घेत कार्तिक सुरेश (Kartik Suresh) या तरुणानं अनोखी दिशा दाखवली. पारंपरिक व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकून फळांच्या खरी किंमतीपासून दूर राहणाऱ्या ग्रामीण उत्पादकांना योग्य दर आणि सुरक्षित बाजारपेठ मिळवून देणारी त्यांची मोहीम आज भारतातील कृषी-स्टार्टअपसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 2021 साली सुरू केलेल्या ‘फ्रेश एन गुड (Fresh N Good)’ या उपक्रमाचं मूळ तत्त्व म्हणजे फार्मर फर्स्ट. शेतकरी केंद्रस्थानी असलेलं, पारदर्शक आणि नफ्याचा योग्य वाटा देणारं हे मॉडेल लवकरच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं.

या उपक्रमाला खरी गती मिळाली ती केरळ आणि हिमाचलमधील शेतकऱ्यांकडून विदेशी प्रकारची फळं थेट खरेदी करण्याच्या पद्धतीमुळे. भारतात मर्यादित ओळखीची असलेली मॅंगोस्टीन, रामबुतान आणि एवोकॅडो यांसारखी फळं आता सरळ ग्राहकांच्या दारात पोहोचू लागली. महत्त्वाचं म्हणजे, दर ठरवताना व्यापाऱ्यांच्या मनमानीला पूर्णविराम देत किमान आधारभूत दराची (MSP) हमी देण्यात आली. उदाहरणार्थ, बाजार कसा ही असो, रामबुतानसाठी शेतकऱ्यांना ठरलेले 125 रुपये प्रति किलो दिले जातात. या प्रामाणिक पद्धतीमुळे सध्या 200 हुन अधिक शेतकरी या मॉडेलशी जोडले गेलेत.

फणसामुळे उघडला नवा रस्ता

दोन वर्षांच्या अनुभवानंतर तरुण उद्योजकाला फणसात मोठी संधी दिसली. शहरांमध्ये फणस सोलण्याचा त्रास, स्वच्छता आणि जातींची माहिती नसल्याने अनेक ग्राहक हा स्वादिष्ट फळापासून दुरावत होते. हे ओळखून जानेवारी 2025 मध्ये 200 ग्रॅमचे खाण्यास तयार असे फणसाचे पॅक बाजारात आणले. घाऊक बाजारात केवळ 100 रुपयांना विकणाऱ्या या उत्पादनाला शहरांमध्ये तुफान मागणी मिळाली.

काही महिन्यांतच परिस्थिती पूर्ण बदलली. आधी 20 किलो फणसाला शेतकऱ्यांना फक्त 12 रुपये मिळत असताना, सोललेल्या गऱ्यांच्या प्रक्रियेमुळे त्याच फणसाचे मूल्य 800 रुपयांपर्यंत पोहोचले. विक्रीही झपाट्याने वाढली. 1000 पॅकेट्सवरून थेट 3000 पॅकेट्सपर्यंत. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं हे खऱ्या अर्थाने सोनं करणाऱ्या कल्पनेला सर्वांनी दाद दिली.

केरळमध्ये हब्स, कोल्ड स्टोरेज आणि जलद डिलिव्हरी

कंपनीची खरेदी केंद्रे केरळमधील तीन जिल्ह्यांत कार्यरत आहेत. नाशवंत फळांची वाहतूक हा मोठा अडथळा असला तरी प्री-सेल बुकिंग, त्वरित वाहतूक आणि तीन अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज युनिट्समुळे उत्पादने 48 तासांत ग्राहकांपर्यंत पोहोचतात. मागील हंगामात तब्बल 80 टन रामबुतान आणि 100 टनांपेक्षा जास्त फणसाची विक्री झाली आहे.

12 लाखांपासून 1.5 कोटींपर्यंतचा प्रवास

पहिल्या वर्षी केवळ 12 लाखांची उलाढाल असलेला हा उपक्रम आज 1.5 कोटी रुपयांच्या महसुलापर्यंत पोहोचला आहे. पुढील ध्येय अधिक मोठं दुबई आणि कॅनडा बाजारात प्रक्रिया केलेल्या फणसाच्या गऱ्यांचे नमुने पाठवून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मजबूत करणे.
ग्रामीण शेतकरी आणि शहरी ग्राहक यांच्यात थेट, विश्वासार्ह आणि नफा देणारं नातं निर्माण करणं—हीच या यशामागची खरी ताकद आहे.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now