धक्कादायक! प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी मुलाने वडिलांना १० दिवस ठेवले डांबून

कल्याण । समाज्यात हव्यासापोटी संपत्ती कमविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लढवल्या जातात. असाच एक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करण्यासाठी वडिलांना दहा दिवस घरात रस्सीने बांधून कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे.

पोलिसांनी पत्नी, मुलगा, पुतण्या आणि भाच्याला अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे. कल्याणमध्ये राहणारे सुरेश पावशे हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या नावावर काही लाखांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता आमच्या नावावर करा अशी मागणी पत्नी आणि मुलगा अनेक दिवसांपासून सुरेश यांच्याकडे करीत होते.

वडिलांना अनेकदा सांगून देखील त्यांनी प्रॉपर्टी मुलाच्या नावावर केली नाही. यानंतर मात्र मुलाने टोकाचे पाऊल उचलत पत्नी, मुलगा निखील, पुतण्या स्वप्नील आणि भाचा पुष्कर या चौघांनी मिळून सुरेश यांना घरात रस्सीने बांधले. त्यांना तब्बल १० दिवस घरात बांधून ठेवले.

दहा दिवसांनी त्यांनी आपली कशीबशी सुटका केली आणि थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सुरेश यांची पत्नी, मुलगा निखील, पुतण्या स्वप्नील, भाचा पुष्कर या चौघांना अटक केली.

७५ ते ८० लाखाची मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस याप्रकरणी अजून तपास करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.