शेतकरी संघटनेतील काही लोकांमुळे राजू शेट्टींबरोबर दुरावा निर्माण झाला – सदाभाऊ खोत

पुणे । शेतकरी संघटनेतील काही लोकांमुळे राजू शेट्टींबरोबर दुरावा निर्माण झाला आहे. त्याचा आमच्या दोघांच्या घरातील लोकांनाही त्रास झाला. असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी हे माझे जवळचे मित्र, आमची मैत्री एका नात्याने जोडली होती. ते जेव्हा खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांच्यासोबत मी त्यांच्या घरी गेलो होतो.

तेव्हा त्यांच्या आईने त्यांना ओवाळले. मलाही त्यांनी ओवाळले आणि मला मिठी घालून त्या म्हणाल्या, माझी ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. हिला दृष्ट लागू नये.

तो प्रसंग आणि ते शब्द आठवले की आजही अंगावर शहारे येतात. राजू शेट्टी यांच्या आईनी त्यांच्यावर जेवढे प्रेम केले, तेवढे प्रेम माझ्यावरही केले. माझ्या आईने माझ्यावर जेवढे प्रेम केले, तेवढे शेट्टी यांच्यावर केले, असे खोत यांनी सांगितले.

राजू शेट्टी आणि माझे नाते भावनेच्या पातळीवर होते. कसलेही वाद असतील, तर आम्ही दोघे एकत्र बसून मिटवत होतो. पण नंतर समज गैरसमज वाढत गेले. त्याचा चळवळीला फटका बसला, असे खोत म्हणाले.

राजू शेट्टी आमदार होत आहेत, याचा आनंद वाटतोय. पण त्यांनी प्रस्थापित लोकांच्या दारात जायला नको होते, आमदारकी त्यांच्या दारात यायला हवी होती. असेही खोत यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.