सोमय्यांनी पवारांवर आरोप करणे थांबवावे नाहीतर फौजदारी कारवाई करणार; राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई। सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्याकडून एकमेकांवर अनेक विषयांवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे चांगलेच चर्चेत आहेत.

किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अहमदगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर आरोप सुरू केले आहेत. याच आरोपांनंतर आता किरीट सोमय्या यांनी हे आरोप थांबवावेत नाहीतर त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी कारवाई केली जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. शारदाताई लगड यांनी दिला आहे.

अ‍ॅड. लगड यांच्या म्हणण्यानुसार, ‘गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी आमचे नेते खासदार शरद पवार व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे. ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात.

सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये. अनेक रथीमहारथींनी पवार यांच्या आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला. उलट तुम्ही आमचे नेते पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वागल पाहिजे हे शिकून घ्या,’ असा सल्लाही लगड यांनी सोमय्या यांना दिला आहे.

तसेच पुढे लगड म्हणाल्या की ‘तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची भीती दाखवू शकत नाही. ईडी काय तुम्हाला तुमच्या घरची मालमत्ता वाटते का? उठसुठ ईडीचा बागुलबुवा दाखवून बेछुट आरोप करण थांबवावे, अन्यथा आम्हाला तुमच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात फौजदारी कारवाई करणे भाग पडेल,’ असा इशाराही अ‍ॅड. लगड यांनी दिला आहे.

त्यामुळे आता या इशाऱ्यावर किरीट सोमय्या काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे नेते सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच मुश्रीफ समर्थकांकडून विरोध होत आहे.

व तेव्हापासून किरीट सोमय्या अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत व नवीन वाद निर्माण होत आहेत. अशातच आता शारदाताई लगड यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर किरीट सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.