“…त्यामुळे न्याय आणि कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये”!

मुंबई । अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी चांगलेच राजकारण तापले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.

आता शिवसेनेनी सीबीआयवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये अनेक हत्या, खून झाले. त्या प्रकरणांमधील किती खरे आरोपी सीबीआयने पकडले?, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या आग्रलेखातून उपस्थित केला आहे.

कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय आणि कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये. ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी आणि हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये, अशी टीका शिवसेनने केली.

कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य आणि न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखले हे बरोबर नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

मुझफ्फरपूरचे नवरुणा हत्याकांड असेल नाहीतर सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत.

त्यांच्या कुटुंबांवर जो अन्याय झाला त्यावर न्याय आणि सत्य यांनी विजय मिळवला नाही. असे म्हणत शिवसेनेने सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ब्रह्मेश्वर मुखियाने रणवीर सेना नावाची खासगी ‘फौज’ बनवली होती. त्याची हत्या होताच बिहारात दंगल उसळली. तपास सीबीआयकडे गेला. पण खरे आरोपी कोणी पकडले असतील तर सांगावे, असे म्हणत शिवसेनेने जोरदार टीका केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.