..तर चव्हाण, देवरा आणि वासनिक यांना राज्यात फिरू देणार नाही; कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद शिगेला

मुंबई । काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून वाद चालू आहेत. अनेक राज्यातील सत्ता देखील काँग्रेसला गमवावी लागली.

यातच आता काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीका केली आहे.

काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहे. आता दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिल्याचे समोर आले.

या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश असल्याचे वृत्त आहे, यानंतर सुनिल केदार यांनी या तिन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.

गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल माफी मागावी. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील.

गांधी घराण्याचे नेतृत्व देशात असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे ट्विट सुनिल केदार यांनी केले आहे.

सुनिल केदार यांच्याआधी संजय निरुपम यांनीही अशाप्रकारे पत्र लिहिणाऱ्यांवर टीका केली होती. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील निरुपम यांनी केला आहे.

आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे. याला केवळ एकच उत्तर आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरु असलेली पडझड थांबवावी.

काँग्रेसला केवळ तेच वाचवू शकतात, असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र या पत्रामुळे काँग्रेसमधील वाद समोर आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.