Silver price: चांदीचे दर गगनाला भिडले! खामगावच्या सराफा बाजारात किलोमागे दर इतक्या लाखांवर…

Silver price: चांदीच्या दरात प्रचंड झेप पाहायला मिळत असून, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) सारख्या नावाजलेल्या चांदीच्या बाजारात आज प्रचंड उलथापालथ झाली आहे. सोमवारी चांदीने विक्रमी दर गाठत गुंतवणूकदारांची झोप उडवलीय. प्रतिकिलो चांदीचा दर तब्बल १,१५,००० रुपये झाला आहे. इतका दर मागील काही वर्षांतील उच्चांक मानला जातोय.

गेल्या काही आठवड्यांपासून चांदीच्या किंमती हळूहळू वाढताना दिसत होत्या. पण, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरची घसरण, महागाईचा कल आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास या सर्व कारणांमुळे चांदीने उडी घेतली आहे.

खामगाव बाजारात खरेदी-विक्रीचा जोर

खामगाव हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरात चांदीच्या घडामोडींसाठी प्रसिद्ध मानलं जातं. इथे दररोज मोठ्या प्रमाणावर चांदीची खरेदी-विक्री होते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यामुळे व्यापारी आणि गुंतवणूकदार चांदीच्या वाटेकडे बघत होते.

दिल्लीपासून देशभरात चांदी महागली

दिल्ली (Delhi) येथील सराफा बाजारातदेखील चांदीच्या दरात सोमवारी तब्बल ५,००० रुपयांची वाढ झाली. शनिवारी दर १.१० लाखांवर पोहोचले होते. आता चांदी १.१५ लाख प्रति किलोदराने विकली जात आहे.

जळगावात (Jalgaon) सोन्याच्या दरात सौम्य वाढ

जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरात सौम्य वाढ झाली असून, दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,००० रुपये इतका आहे. जीएसटीसह तो १,०१,००० रुपये झाला आहे. मात्र, चांदीच्या तुलनेत सोन्याचा कल स्थिर वाटतोय.

विश्लेषकांचा अंदाज: चांदी बनणार नवा पर्याय

चांदीच्या दरात झालेली झपाट्याने वाढ पाहता, अनेक बाजारतज्ज्ञ चांदीला गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून पाहत आहेत. भविष्यातही किंमती वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी सतर्क राहावं, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.