Shubhanshu Shukla: भारतीय अंतराळवीर (Indian Astronaut) शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी १७ दिवसांच्या अवकाशमोहिमेनंतर आज, १४ जुलै रोजी पृथ्वीवर परतण्याची तयारी सुरू केली आहे. त्याआधी १३ जुलै रोजी अंतराळ स्थानकावर झालेल्या निरोप समारंभात त्यांनी १९८४ साली भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांनी उच्चारलेला ऐतिहासिक वाक्यप्रचार, “सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा” पुन्हा एकदा आवर्जून उच्चारला आणि भारताला भावनिक अभिवादन केले.
शुभांशू यांनी सांगितले की, २५ जून रोजी जेव्हा त्यांनी फाल्कन ९ रॉकेट (Falcon 9 Rocket) द्वारे मोहिमेला सुरुवात केली, तेव्हा हा अनुभव इतका विलक्षण असेल याची कल्पनाही नव्हती. “ही संपूर्ण मोहिम माझ्यामागे उभ्या असलेल्या टीममुळेच यशस्वी झाली,” असे ते म्हणाले. या अडीच आठवड्यांत त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Station) विविध वैज्ञानिक प्रयोग केले, शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेतला, आणि मोकळ्या वेळेत पृथ्वीच्या सौंदर्याचे अवलोकनही केले.
अॅक्सिओम-४ (Axiom-4 Mission) या खासगी मोहिमेअंतर्गत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन सदस्य ISS वर गेले होते. ही मोहीम २५ जून रोजी फ्लोरिडा (Florida) येथील केनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) मधून सुरू झाली. अवघ्या २८ तासांत त्यांचे ड्रॅगन अंतराळयान (Dragon Spacecraft) ISS वर डॉक करण्यात आले. ही मोहीम १४ दिवसांची नियोजित होती, मात्र हवामान आणि तांत्रिक कारणांमुळे त्यांचे परतणे चार दिवसांनी विलंबित झाले.
या मोहिमेसाठी भारत सरकारने सुमारे ५४८ कोटी रुपये खर्च करून एक जागा आरक्षित केली होती. शुभांशू शुक्ला यांची निवड भारतीय हवाई दल (Indian Air Force) आणि इस्रो (ISRO) यांच्या शिफारशीनुसार नासा (NASA) आणि अॅक्सिओम (Axiom) च्या संयुक्त करारांतर्गत करण्यात आली. यावेळी त्यांनी भारतीय संस्थांचे ७ जैविक व वैज्ञानिक प्रयोग, तसेच नासाच्या इतर ५ प्रयोगांमध्ये सहभाग घेतला. हे प्रयोग गगनयान (Gaganyaan Mission) मोहिमेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
४१ वर्षांनंतर भारताचा एक अंतराळवीर अंतराळात गेला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी रशियन मोहिमेच्या माध्यमातून इतिहास रचला होता. शुभांशू यांचा अनुभव भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचा पाया मजबूत करणारा ठरणार आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत २०२७ पर्यंत भारताचे अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाणार आहेत.
२८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुभांशू शुक्ला यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी विचारले की अवकाशातून प्रथम काय जाणवले? त्यावर शुभांशू म्हणाले, “अवकाशातून कोणत्याही देशाची सीमा दिसत नाही, पृथ्वी ही एकसंध भासते.” त्यांनी सांगितले की, एक दिवसात १६ वेळा सूर्योदय व १६ वेळा सूर्यास्त पाहायला मिळतो. तसेच, त्यांनी गाजराचा हलवा अंतराळात नेला असून तो आपल्या सहकाऱ्यांसोबत वाटून खाल्ला असल्याचेही त्यांनी नमूद केले.