Sharad Pawar : जळगाव जिल्ह्यातून महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार(SHARAD PAWAR) गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या गटाचे दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदार लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत.
डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात
शरद पवार यांच्यासोबत गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत असलेले माजी मंत्री डॉ. सतीश पाटील अजित पवार(AJIT PAWAR) गटात प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. “पक्षात माझ्यावर अन्याय होत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवून निर्णय घेत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. २ मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे.
दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर(GULABRAV DEVKAR) यांचा प्रवेश काही महिन्यांपासून प्रलंबित होता, मात्र आता तोही लवकरच निश्चित होणार आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेत बैठक होणार असून, त्यामध्ये माजी आमदार कैलास पाटील, तिल्लोतमा पाटील आणि शरद पवार गटाचे काही पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संजय पवार यांचा दुजोरा
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार(SANJAY PAWAR) यांनी या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराची सूचना दिली होती. त्यानुसार आता घडामोडी घडताना दिसत आहेत.
शरद पवार गटाला फटका, अजित पवार गटाचे बळ वाढणार
डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर हे दोघेही जळगाव जिल्ह्यात मजबूत जनसंपर्क असलेले नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्तेही अजित पवार गटात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटासाठी ही स्थिती आव्हानात्मक ठरू शकते, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे राजकीय वजन निश्चितच वाढेल.
shocking-news-for-sharad-pawar