Beed : बीड जिल्ह्यात एका तरुण ट्रकचालकाची अमानुषपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकास अण्णा बनसोडे (वय 23), हा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी गावचा रहिवासी होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घरच्यांना आला होता. याच रागातून क्षीरसागर यांनी नातेवाईकांच्या मदतीने विकासला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केली. या क्रूर मारहाणीत विकासचा मृत्यू झाला.
प्रेमसंबंधाचा संशय ठरला मृत्यूचे कारण
गेल्या आठवड्यात विकास कड परिसरात आला असताना, तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीसोबत त्यांच्या शेतामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचा दावा केला जात आहे. हे पाहून संतप्त झालेल्या क्षीरसागर यांनी आपल्या कुटुंबीयांसह विकासला पकडले आणि एका पत्र्याच्या शेडमध्ये बंद करून दोरी व वायरच्या सहाय्याने अमानुष मारहाण केली. यामध्ये त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह टाकून आरोपींचा फरार
विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन सोडला आणि तेथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि यात खळबळजनक बाबी उघड झाल्या.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल, काही अद्याप फरार
या प्रकरणी बीड पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर आणि सुवर्णा क्षीरसागर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
हत्या करतानाच विकासच्या कुटुंबीयांना फोन
हत्या करण्यापूर्वी आरोपींनी विकासच्या फोनवरूनच त्याच्या आई-वडिलांना कॉल केला होता. भाऊसाहेब क्षीरसागर यांनी त्यांना तातडीने घरी येण्यास सांगितले होते. त्यावेळी विकासच्या आई-वडिलांनी त्याला सोडण्याची विनंती केली होती, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत. बीड जिल्ह्यात घडलेल्या या हत्याकांडाने संतापाची लाट उसळली आहे.