Share

Dhanjay Munde : गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या अन्…; निलंबन होताच पीआयचे परळीतील निवडणुकीबद्दल धक्कादायक दावे, मुंडेंच्या अडचणी वाढणार?

Dhanjay Munde :गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. परिणामी, राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर एका मंत्र्याचा राजीनामा, काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबनाच्या कारवाया पाहायला मिळाल्या. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली असून, PSI रणजीत कासले यांचे निलंबन करण्यात आले आहे.

तडजोड करत पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निलंबन

PSI रणजीत कासले यांच्यावर परराज्यात तपासासाठी गेले असताना तडजोडीअंतर्गत पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने ही बाब राज्य पातळीवर गाजली. या घटनेची चौकशी केल्यानंतर बीड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवनीत कांवत यांनी कासले यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

कासले यांचे खळबळजनक आरोप – धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची नावे घेतली

निलंबनाच्या निर्णयानंतर PSI रणजीत कासले यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल करत आपल्यावरील कारवाई ही राजकीय दबावामुळे झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“विधानसभा निवडणुकीत मला अचानक बदलले”

एका व्हिडिओमध्ये कासले यांनी विधानसभेच्या काळातील एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले,
“धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाहून नेले जात होते. मी त्या गाड्यांची तपासणी केली होती. त्यामुळेच निवडणुकीच्या दिवसात मला अचानक कामावरून हटवण्यात आले.”

कासले यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला की, “त्या दिवशी, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या खात्यातून माझ्या खात्यात 10 लाख रुपये जमा करण्यात आले. हे पैसे का आले, याची चौकशी व्हावी,” असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केले आहे.

“दारू पिऊन मी खोटं बोललो नाही”

पुढच्या व्हिडिओमध्ये रणजीत कासले यांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की,
“लोक म्हणतात की मी दारू पिऊन व्हिडिओ बनवले. पण दारू पिऊन माणूस खोटं बोलत नाही, उलट खरं बोलतो. मला अचानक निलंबित करण्यात आलं. कोणी आणि का केलं? कोणाचे फोन गेले? याची चौकशी झाली का?”

त्यांनी पुढे आयपीएस अधिकारी निखिल गुप्ता, मुकेश नाहटा आणि सुरज बिल्डर यांच्यावर आरोप करत म्हटले की, “त्यांच्या बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं. या सगळ्या गोष्टींचा मी पुराव्यासह खुलासा करणार आहे. पण माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नये.”

कासले यांच्या आरोपांमुळे नवा वाद – चौकशीची मागणी

PSI रणजीत कासले यांनी केलेल्या या आरोपांमुळे बीडमधील राजकीय आणि पोलीस दलातील वातावरण तापले आहे. त्यांनी सादर केलेल्या माहितीची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now