Share

Baramati Crime News: “मला माफ करा…” बारामतीत बँक मॅनेजरने गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं, सुसाईड नोट वाचून डोळे पाणावतील

Baramati Crime News : बारामती (Baramati) शहरातून एक अत्यंत हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या राष्ट्रीयकृत बँकेच्या भिगवण रोडवरील शाखेत कार्यरत असलेले शाखा व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (Shivshankar Mitra) यांनी बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री उशिरा (ता. 18 जुलै) ही घटना घडली असून, या प्रकारामुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशातील

शिवशंकर मित्रा हे मूळचे प्रयागराज (Prayagraj, Uttar Pradesh) येथील रहिवासी होते. ते गेल्या काही वर्षांपासून बारामतीमधील बँक ऑफ बडोदा शाखेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मात्र, गेल्या काही काळापासून कामावरून मोठा मानसिक दबाव असल्याने ते सतत तणावात होते. त्यांनी घरच्यांसमोर या त्रासाबद्दल अनेकदा व्यक्त केलं होतं आणि काही दिवसांपूर्वीच बँकेला स्वेच्छानिवृत्तीचा (voluntary retirement) अर्जही दिला होता. परंतु, त्यावर कोणतीही सकारात्मक दखल घेतली गेली नाही.

मृत्यूपूर्वीची शेवटची चिठ्ठी

आपल्या मृत्यूपूर्वी शिवशंकर मित्रा यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिलं, “बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलतोय. कृपया कर्मचाऱ्यांवर इतका दबाव टाकू नका. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतो.”

याच चिठ्ठीत त्यांनी आपल्या कुटुंबाची कोणतीही जबाबदारी नाही, हे नमूद केलं असून पत्नी प्रिया (Priya) आणि मुलगी माही (Mahi) यांची माफी मागितली आहे. तसेच, “शक्य असल्यास, माझे डोळे दान करा,” अशी शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मानसिक त्रासामुळे टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या मानसिक तणावामुळे शिवशंकर मित्रा हे अत्यंत खचले होते. वरिष्ठांकडे अनेकदा कामाच्या दबावाविषयी तक्रार करूनही त्यांच्या समस्या दुर्लक्षित करण्यात आल्या. शेवटी, या असह्य त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमधून हे स्पष्ट होतं की ही कृती त्यांनी पूर्णपणे स्वेच्छेने, मानसिकदृष्ट्या ठाम निर्णयाने केली.

या घटनेमुळे बारामतीत सर्वत्र शोककळा पसरली आहे. एक जबाबदार अधिकारी बँकेच्या व्यवस्थापनातील असंवेदनशीलतेमुळे आत्महत्या करतो, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या शेवटच्या पत्रातील शब्द वाचून अनेकजण भावूक झाले आहेत.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now