शिवसेनेचे नेते अनंत गीते बरोबर बोलले, नाना पटोलेंनी पुन्हा शरद पवारांना डिवचले

मुंबई । राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सध्या सत्तेवर आहे. असे असले तरी तिन्ही पक्षात सतत एकमेकांवर टीका केली जाते. आता शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

ते म्हणाले होते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही.

आता त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी समर्थन केले आहे. पटोले म्हणाले, अनंत गीते यांच्या खंजीर खुपसला आणि शरद पवारांच्या वक्तव्यावर आमचे कोणतेही स्टेटमेंट असणार नाही. केवळ आम्ही एकत्र होतो हे त्यांचे वक्तव्य बरोबर आहे. शिवसेना- काँग्रेस युती होऊ शकत नाही असे म्हटले जात होते. महाविकास आघाडी ही त्यावेळची राजकीय परिस्थितीनुसार तयार झाली.

त्यामुळे अनंत गीतेंच्या या वक्तव्याचे आम्ही समर्थन करतो. हे बरोबरच आहे. अनंत गीते काय चुकीचे बोलले नाहीत, असेही ते म्हणाले, यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असेही गीतेंनी म्हटले होते.

अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनीच अनंत गीते यांचा पराभव केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचा राग आहे. कोकणातील ते एक बडे नेते आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.