Shivraj Bangar : बीड (Beed) जिल्ह्यात सध्या राजकारणात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटातील शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोपांची मालिका उघड केली आहे. त्यांनी म्हटलं की, वाल्मिक कराड (Valmik Karad) याने त्यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती आणि इतकंच नाही, तर तो माझे हातपाय तोडताना लाईव्ह पाहू इच्छित होता!
“सुपारी घेणाऱ्यानं खून केला…”
शिवराज बांगर यांनी बीडमधील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनी आठवले (Sunny Athawale) या युवकाचं नाव घेतलं आणि दावा केला की, कराडने सुपारी दिली होती, मात्र आठवलेने खून केला नाही. तरीही त्याच्यावर बनावट गुन्हा लादण्यात आला. त्यामुळे संपूर्ण कारस्थान उघडं पडलं पाहिजे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
थेट धनंजय मुंडेवर बोट
बांगर यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, कराड फक्त पुढे असलेला प्यादा आहे. याच्या पाठीमागे खरी ताकद होती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची. परळी (Parli) येथील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या खुनानंतर, बापू आंधळे (Bapu Andhale) यांच्या हत्येचंही सूत्र कराडकडेच होतं, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांच्या मते, धनंजय मुंडे यांचा पाठिंबा असल्यामुळे कराडला असं धाडस करता आलं. “ताकदीचा वापर करून हे सगळं केलं गेलं. आता ‘माझी काही चूक नाही’ असं म्हणणं धनंजय मुंडे यांना परवडणार नाही,” असा थेट इशारा शिवराज बांगर यांनी दिला.
बापू आंधळेंची हत्या
बांगर यांनी पुढे सांगितलं की, गोट्या गीते आणि त्याच्या गँगने ही हत्या केली. गोट्या गीतेसह आरोपी महादेव गीते (Mahadev Gite) सध्या तुरुंगात आहेत. आणि हत्येमागे राजकीय कारण स्पष्ट आहे – बबन गीते (Baban Gite) विधानसभेच्या रिंगणात येऊ नये म्हणूनच आंधळेंचा काटा काढण्यात आला, असा थेट आरोप त्यांनी लावला.
SIT नेमून चौकशी करा
या साऱ्या प्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमावं, अशी जोरदार मागणी बांगर यांनी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, या मागे राजकीय सूडभावना आहे आणि सत्य उजेडात यावं म्हणून यंत्रणेनं स्वतंत्र तपास करावा.
या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. आधीच मुंडे गट आणि पवार गट यांच्यातील तणाव स्पष्ट दिसत असताना, आता हे आरोप राजकीय वातावरण अधिकच तापवणारे ठरत आहेत.