शिवसेनेच्या मुखपत्रातूनच संजय राऊतांवर जोरदार टीका; तुम्ही पक्षाला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवले..

मुंबई । गेल्या काही दिवसांपासुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. असे असताना आता शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

आता मात्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी सामनातूनच उत्तर दिले आहे. तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

विशेष म्हणजे हा लेख सामनामध्येच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. सामनातून चंद्रकांत पाटील यांनी अग्रलेखाला दिलेले उत्तर छापण्यात आले आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, तुमचे आभार मानण्याचे बरेच दिवस डोक्यात होते. कारण तुम्ही वारंवार मला अग्रलेखातून लक्ष्य करता.

तुम्ही अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बडय़ा नेत्यांवर टीका करता आणि माझ्यावरही टीका करता त्यामुळे मला बडय़ा नेत्यांच्या रांगेत नेण्याचा सन्मानही देता. आज तुम्ही ‘तोंडास फेस, कोणाच्या ?’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहून मला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

आता मात्र तुमचे आभार मानलेच पाहिजेत असे वाटल्याने हे पत्र लिहिले. तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. चंद्रकांत पाटील म्हणाले, मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो.

आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात.

हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचा उदो उदो करताना तुम्ही शिवसेनेलाही सुपडा साफ म्हणायला कमी करत नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पक्षाला ‘ना घर का ना घाट का’, असे करून ठेवले.

भाजपाचे नुकसान करणाऱ्या शिवसेनेची राजकीय पत तुम्ही संपवलीत, तुम्ही सातत्याने शरद पवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन करत असता त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. तुम्ही पलटी मारली असेल तर तो तुमच्या पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे,असेही पाटील म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.