शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Shiv Sena rebel MLAs in trouble only three options left)
एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आहे. शिवसेनेकडून अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि ४६ बंडखोर आमदारांपुढे सध्या तीनच पर्याय आहेत.
पहिला पर्याय म्हणजे हा गट दुसऱ्या पक्षात विलीन करावा लागेल. दुसरा पर्याय म्हणजे या सर्व आमदारांना शिवसेनेतच राहावे लागेल आणि तिसरा पर्याय म्हणजे या गटातील सर्व आमदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, अशी माहिती शिवसेनेच्या टेक्निकल टीमने दिली आहे. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत शिवसेनेच्या टेक्निकल टीमने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट निर्माण करता येणार नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीनीकरण करावे लागेल. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाबद्दल विचारणा करण्यात येऊ शकते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाला हे स्पष्ट करावे लागणार आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे आणि ४६ आमदारांची बंडखोरी फारकाळ टिकणार नाही, असे शिवसेनेच्या टेक्निकल टीमने जिल्हाप्रमुखांना सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली होती.
“एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याजवळची दोन खाती मी एकनाथ शिंदे यांना दिली. यापूर्वी नगरविकास खातं मुख्यमंत्री स्वतःजवळ ठेवत होते. पण मी ते खातं एकनाथ शिंदेंना दिलं. भाजपनेच एकनाथ शिंदे यांना फुस लावली आहे. हे सर्व भाजपनेच केलं आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले होते.