अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. देशात भाजपला यश मिळत असेल, पण कोल्हापूर भाजपमुक्त आहे. त्यामुळे अमित शहा यांनी कोल्हापूरला टार्गेट केले आहे. आज अमित शहा यांची कोल्हापुरात जाहीर सभा झाली, यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व 48 जागा भाजप आणि मोदींना द्याव्यात.
त्यामुळे शिंदे गटाला काय मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यापूर्वी महाराष्ट्र भाजपने राज्यात मिशन 45 चा नारा दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रालोआ महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला होता.
आज शाह यांनी 48 जागांवर दावा केला आहे. अशा स्थितीत शिंदे गटाला केवळ तीनच जागा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या सर्वच जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. कोल्हापुरात शिंदे गटाचे वर्चस्व आहे. मात्र त्या जागेवरही भाजप दावा करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच आजची सभा नियोजित होती. अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे. त्या जागेवर सद्या शिंदे गटाते संजय मंडलीक खासदार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमित शहा यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी रणनीती आखली असून त्यांनी राज्यातील 48 लोकसभा जागांवर दावा केला आहे.
कोल्हापुरातील सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय भांडण उफाळून आले आहे. नागपूर आणि पुण्यातील कार्यक्रम आटोपून अमित शहा आज कोल्हापुरात आले. यावेळी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीसह इतर सर्व पक्ष आमच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत.
परंतु, आगामी लोकसभा निवडणूक केवळ नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठीच नाही तर भारताला महान आणि समृद्ध बनवण्यासाठीही महत्त्वाची ठरेल, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. मी जेव्हा-जेव्हा कोल्हापुरात आलो आणि श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले तेव्हा भाजपचा विजय झाला आहे.
त्यामुळेच मी आज अंबाबाईचे दर्शन घेतले आणि त्यामुळेच 2024 मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. एकदा भाजपने एक जागा जिंकली की तिथे भाजप पुन्हा निवडून येतो. अमित शहा यांनीही आगामी निवडणुकीची चिंता नसल्याचे स्पष्ट केले आहे.