Shashikant Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील अध्यक्षपदासाठी चर्चेला जोर चढला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे नाव आघाडीवर असल्याचं समजते. मात्र, अद्याप या संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
या घडामोडींनंतर शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधत स्पष्ट केलं की, “अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शरद पवार साहेब (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जयंत पाटील जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल.”
ते पुढे म्हणाले, “१५ जुलै रोजी पक्षाची बैठक आहे. काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव आहे. जेव्हा अंतिम निर्णय होईल, तेव्हा मी जबाबदारीनं काम करेन.”
शरद पवार यांचं नेतृत्व आणि कार्यसंघटनेवर भर
शिंदे यांनी सांगितलं की, “संघटनेच्या माध्यमातून पवार साहेबांनी महाराष्ट्रात इतिहास घडवला. पक्ष उभा करताना त्यांनी नेहमी संघर्ष केला. जयंत पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांची तुलना इतर कुणाशी होऊ शकत नाही.”
सामाजिक बदल, बेरोजगारी आणि नव्या नेतृत्वावर भर
“जर संधी मिळाली तर ते माझं भाग्य असेल,” असं सांगत शिंदे यांनी सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देण्याचा निर्धार व्यक्त केला. “बेरोजगारी, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न – हे खरे आव्हान आहेत. निवडणुकीत आश्वासनांची खैरात होते, पण आपण ती सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे,” असंही ते म्हणाले.
विरोधकांवर टीका
“महायुती सरकारच्या (Mahayuti Government) चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवून जनतेला जागृत करावं लागेल. लोकांमध्ये असलेलं अंडरकरंट प्रज्वलित करणं गरजेचं आहे. सध्याच्या निवडणूक पद्धतीत लोकांचे प्रश्न नाहीसे झाले आहेत,” असं शशिकांत शिंदे म्हणाले.
नव्या लोकांना संधी आणि नेतृत्वनिर्मितीचं वचन
शिंदे म्हणाले, “शरद पवार साहेबांचा एक गुणधर्म म्हणजे नवीन लोकांना संधी देणं. जे राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत, त्यांना पुढे आणल्यास खरा बदल घडू शकतो. सत्ता बदलत असल्याचं चित्र दिसतंय, त्यामुळे नव्या लोकांना उभं करणं आवश्यक आहे.”
शेवटी, शशिकांत शिंदे यांनी सांगितलं, “मला संधी मिळाली, तर मी आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्या मार्गावर चालत काम करण्याचा प्रयत्न करेन.” दरम्यान, मंगळवारी शरद पवार यांच्या पक्षाची जनरल बॉडी बैठक होणार आहे. या बैठकीत जयंत पाटील यांच्याकडील कार्यभार औपचारिकपणे शशिकांत शिंदे यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे.