Share

Uddhav Thackeray : स्वर्गासारख्या देशाला नरक बनवण्याचा प्रयत्न, शरद पवारसाहेब आपल्याला हे सरकार घालवावं लागेल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : “हे सरकार आपण घालवायलाच हवं, कारण जे लोक आपला स्वर्गासारखा देश नरक बनवत आहेत, त्यांना नरकात टाकण्याची वेळ आली आहे,” अशा परखड शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘नरकातला स्वर्ग’ या खासदार संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ लेखक व कवी जावेद अख्तर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकातूनच आपल्याला लढण्याची उर्मी मिळाल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. “वन नेशन, वन इलेक्शन” ही संकल्पना आकर्षक वाटत असली तरी ती पारदर्शक नाही, असे त्यांनी नमूद केले.  “आपल्या सरन्यायाधीशांच्या मातोश्रीने सांगितलं – एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. संशय दूर करण्यासाठी हे गरजेचं आहे. पण ते करणार नाहीत. कारण त्यांना सर्व सत्ताच आपल्या हातात हवी आहे,” असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.

पंतप्रधान प्रचारक असू शकत नाहीत

“जेव्हा ‘वन नेशन’ म्हणतो, तेव्हा एक पंतप्रधान देशासाठी असतो. तो केवळ एका पक्षाचा प्रचारक कसा होऊ शकतो? जर प्रचारक व्हायचं असेल तर सर्वच उमेदवारांचा प्रचार करा. तेव्हाच खरी लोकशाही म्हणता येईल,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे सर्वसामान्यांच्या सभा आणि कार्यक्रमांना अडथळा येतो, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“आम्ही दुश्मन कधी झालो?” – अमित शहांना थेट सवाल

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.  “अमित शाह, तुम्ही आम्हाला एवढा दुश्मन का समजता? आमचं तुमच्याशी मतभेद आहेत, पण त्यासाठी आम्हाला पाकिस्तानपेक्षा आधी संपवायला निघालात का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “आमचं हिंदुत्व हे देशहितासाठी आहे. त्यामुळे आमचं राष्ट्रप्रेम कमी नाही. पण तरीही तुम्ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहात.”

शरद पवार आणि जावेद अख्तर यांची उपस्थिती ठळक

संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं प्रकाशन हा केवळ साहित्यिक कार्यक्रम नव्हता, तर सत्तेच्या विरोधात एकजूट दाखवणारा राजकीय मंचही ठरला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसल्याने, आगामी राजकीय घडामोडींसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

लढण्याची हाक – राजकीय रणभूमी पेटणार

उद्धव ठाकरे यांनी भाषणातून स्पष्ट संदेश दिला आहे – देश वाचवायचा असेल तर सध्याच्या सरकारविरुद्ध निर्णायक लढा उभा करणं आवश्यक आहे. संजय राऊत यांच्या पुस्तकातून मिळालेली ही प्रेरणा केवळ साहित्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत निर्णायक ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
sharad-pawar-saheb-we-will-have-to-throw-out-this-government-uddhav-thackeray

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now