शरद पवारांच्या ऊसतोड कामगारांच्या बैठकीत गोंधळ! भाजप आमदार सुरेश धसांना प्रवेश नाकारला

पुणे । सध्या राज्यात उस तोडणी कामगारांचा प्रश्न पेटला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाद सुरू झाले आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.

यासाठी मांजरी येथे ऊस तोडणी कामगार प्रतिनिधी यांच्याशी बैठक सुरू आहे. मात्र यामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांना प्रवेश नाकारला आहे. या बैठकीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत.

सध्या ऊसतोड गाळप हंगाम सुरू झाला आहे. ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी ऊस तोडणी कामगार संघटना साखर कारखानदारांशी चर्चा करत आहेत. यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भाजप आमदार सुरेश धस हे गेले काही दिवस ऊसतोड मजुरांचे प्रश्न मांडत आहेत. यासाठी ते मेळावे आयोजित करत आहेत. यावर तोडगा काढला नाही तर ऊस तोडू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मजुरी दरात शंभर टक्क्यांहून अधिक वाढीची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्याशी देखील त्यांचे मतभेद झाल्याचे दिसून आले. ऊस तोडणी कामगारांमध्ये धस हे आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक त्यांच्यावर टीका करत होते.

पंकजा मुंडे आणि धस यांच्यातही आधीप्रमाणे सख्य नसल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. शरद पवारांसोबत बैठक झाल्याशिवाय ऊस तोडायला जाऊ नका, असे आवाहन धस करत होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.