महाविकास आघाडी केवळ तडजोड, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, शिवसेनेचे मोठे वक्तव्य

मुंबई । राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सध्या सत्तेवर आहे. असे असले तरी तिन्ही पक्षात सतत एकमेकांवर टीका केली जाते. आता शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

ते म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा प्रहार त्यांनी केला आहे. यामुळे आता राष्ट्रवादीकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच ते म्हणाले, कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत. श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते बोलत होते.

आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असेही गीतेंनी म्हटले आहे.

अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनीच अनंत गीते यांचा पराभव केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचा राग आहे. कोकणातील ते एक बडे नेते आहेत.

२०१४ मध्ये मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून आता काय भूमिका घेतली जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.