दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. यामुळे शेतकरी आता आक्रमक झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भेट घेणार आहेत. शरद पवार राष्ट्रपतींशी कृषी कायद्यांविषयी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार देखील मैदानात उतरले आहेत.
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे. हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवतील. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला आहे.
राज्यात देखील शेतकरी नेते राजू शेट्टी, तसेच मंत्री बच्चू कडू देखील आक्रमक झाले आहेत. यामुळे हे आंदोलन देशभरात पेटले आहे. कोणाचीही चर्चा न करता मोदी सरकारने हे अन्यायकारक कायदे केले आहेत. अशी टीका केली जात आहे.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचे समर्थन करत ‘मौन व्रत’ धारण केले. सरकारने हे कायदे मागे घेणार की नाही याचे उत्तर केवळ ‘होय’ की ‘नाही’ या शब्दांत द्यावे अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. यामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.