Share

Sharad Pawar On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर अश्लील टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन करून विचारला जाब

Sharad Pawar On Gopichand Padalkar: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केलेल्या तीव्र टीकेमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करत पडळकरांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. “अशा प्रकारे गलिच्छ पातळीवर टीका करणे योग्य नाही,” अशा शब्दांत पवारांनी नाराजी व्यक्त केली.

पडळकरांची वादग्रस्त टीका

सांगली जिल्ह्यातील जत (Jat Sangli) मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी जयंत पाटलांवर अवमानकारक शब्दांत टीका केली. “जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे, दर आठवड्याला आपलं बिनडोकपण सिद्ध करतो. मी त्याच्यासारखा भिकाऱ्याची औलाद नाही,” असे तीव्र वक्तव्य त्यांनी केले. इतकेच नव्हे, तर पाटलांचा राजारामबापू पाटील यांच्याशी रक्ताचा संबंध नसावा, अशा संशयास्पद टिप्पणीसुद्धा त्यांनी केली. यामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली.

अजित पवारांचा संयमी सल्ला

या वादग्रस्त विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. “महायुती सरकारमध्ये जर कोणी वादग्रस्त विधान केले, तर त्या पक्षाची जबाबदारी त्याच पक्षाच्या नेत्याने घ्यावी,” असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वतःच्या पक्षातील विधानांची जबाबदारी आपण घेतो, शिवसेनेची जबाबदारी एकनाथ शिंदे यांची आणि भाजपमधील विधानांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, “आपल्या महाराष्ट्रात राजकारणात एक सुसंस्कृत परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राजकारणात संयम, आदर आणि संस्कार टिकवले गेले आहेत. त्यामुळे अशी वक्तव्ये केवळ वेदनादायीच नाहीत तर समाजात तणाव निर्माण करणारी असतात.” संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना समाजात सलोखा आणि शांतता टिकवणं आवश्यक आहे, असे आवाहन अजित पवारांनी केले.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now