कार्यकर्त्याच्या देवघरात आपला फोटो पाहून शरद पवार झाले भावुक

 

पुणे। माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी माजी आमदार विलास लांडे यांच्या भोसरी येथील निवासस्थानी भेट देऊन लांडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

जुने सहकारी असलेल्या विठोबा लांडे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. देवघरात जाऊन दिवंगत विठोबा लांडे यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी देवघरात त्यांची स्वतःची प्रतिमा ठेवण्यात आल्याचे त्यांनी पाहिले.

विलास लांडे यांनी वडील विठोबा लांडे हे तुम्हाला देवासमान मानत होते. ते नित्यनेमाने देवासोबत तुमचीही पूजा करत होते, असे यावेळी सांगितले. एका कार्यकर्त्याने देवाचा दर्जा दिल्याचे पाहून शरद पवार भावुक झाले.

माजी आमदार विलास लांडे यांचे वडील विठोबा सोनबा लांडे यांचे ३० जून रोजी निधन झाले. वारकरी, पहिलवान असलेल्या दिवंगत विठोबा लांडे यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे जुने सहकारी होते.

एक महिना आधी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी विलास लांडे यांना फोन करून सांत्वन करताना वडिलांचीही विचारपूस केली होती. तसेच, विठोबा लांडे यांचे वय १०२ वर्षे असल्याचे समजल्यानंतर त्यांना भेटले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

मात्र ही भेट होण्याआधीच विठोबा लांडे यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यामुळे शरद पवार यांची ती इच्छा अपुरीच राहिली. दिवंगत विठोबा लांडे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करून शरद पवार यांनी लांडे कुटुंबीयांचा निरोप घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.